जन्मेजयराजे भोसले यांनी उजनीच्या पाण्यासाठी लावला दादांना फोन !
अक्कलकोट :(प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अक्कलकोट शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे जन्मेजयराजे भोसले यांनी उजनी धरणातील पाणी हे कुरनूर धरणात सोडण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मोबाईल फोन द्वारे संपर्क साधून उजनीतील पाणी कुरनूर धरणात सोडण्यात यावी ही मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन जन्मेजयराजे भोसले यांना दिले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांची पत्रकारांनी सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट घेतली. जन्मेजयराजे भोसले यांनी यावेळी अक्कलकोट शहर व परिसरातील विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा अल्पावधीत झालेला विकास हा सर्वांनाच दिलासादायक असल्याचे सांगितले. यावेळी जन्मेजयराजे भोसले यांनी उजनी धरण हे शंभर टक्के भरले असून, या धरणातून लाखो लिटर पाणी हे भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
उजनी धरणातील पाणी हे कुरनूर धरणात सोडल्यास याचा फायदा हा अक्कलकोट शहर व तालुका वासियांना होणार आहे असे सांगितले. जन्मेजयराजे भोसले यांनी तात्काळ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मोबाईल वरून फोन लावला. उजनी धरणातील पाणी हे कुरनूर धरणात सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच याची कार्यवाही होणार असल्याची माहिती जन्मेजयराजे भोसले यांना दिले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सेवा करणारे लाखो भाविकांना महाप्रसादाची मोफत सोय करणारे जन्मेजयराजे भोसले हे अक्कलकोट शहर व तालुक्यातील जनतेसाठी तेवढेच कार्यतत्पर असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले. जनतेच्या समस्यासाठी सदैव दक्ष असल्याचे जन्मेजयराजे भोसले यांच्यातून दिसून आले.