सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सुभाष देशमुख, विजय देशमुख की सचिन कल्याणशेट्टी..
सोलापूर : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत.
सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांनी मिळवला असून त्यानंतर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत आणि सलग दोन वेळा अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी आणि मंगळवेढ्याचे समाधान आवताडे ते आमदार झाले आहेत.
यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळाले होते. आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करते याची उत्सुकता आहे. दरम्यान मुंबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्री पदे मिळणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री. त्यामुळे आता सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.
पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत. त्या दोघांनाही मंत्रिपद मिळणार की, या दोघांपैकी एकाला संधी मिळणार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला परंतु यंदा हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कुणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.