महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामीण विकास योजना अंमलबजावणीमध्ये पंचायत समिती अक्कलकोट पुणे विभागात अव्वल !!
गट विकास अधिकारी सचिन खुडे यांचे सर्वत्र कौतुक
अक्कलकोट ( प्रतिनीधी) महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या योजनाविषयक कामगिरीच्या मुल्यमापनाकरिता व प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी सन 2005-06 पासून राज्यस्तर व विभागस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु केलेली आहे. पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणा-या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन शासनाने राज्यस्तर व विभागस्तर अशा दोन स्तरावर ही अभिनव योजना सुरु केली आहे.
सदर अभियानाच्या अनुषंगाने शाश्वत विकास ध्येय अंतर्गत 17 उदिृष्टे आणि 9 संकल्पना अंतर्गत पंचायत समितीला त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व विभागांच्या कामकाजा संबंधाने प्रश्नावली दिली गेली. यामध्ये केलेल्या कामाच्या अनुषंगाने प्रथम विभागस्तरीय समितीद्वारे पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाची तपासणी करण्यात आली. सदरच्या विभागस्तरीय समितीने राज्य शासन अहवाल सादर केला त्यानंतर राज्य स्तरीय समितीने पंचायत समिती अक्क्लकोट कार्यालयाचे मुल्यमापन केले. सदरच्या राज्यस्तरीय मुल्यमापनामध्ये पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाने एकूण 400 पैकी 361 गुण प्राप्त करुन पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक 12 जून रोजी निर्गमित केला आहे.
हे यश मिळविण्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदिप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यानेच यशवंत पंचायत राज अभियानामध्ये पंचायत समिती अक्कलकोट यांना सर्वौत्कृष्ट कामगिरी करता आल्याची माहिती गट विकास अधिकारी श्री.सचिन खुडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.