“मदतीचा हात… आणि माणुसकीचा स्पर्श” छायाचित्रकार पवन घटकांबळे आणि मित्र परिवार यांचा प्रेरणादायी उपक्रम
पूराच्या पाण्यात वाहून गेल्या अनेकांच्या आशा… पण माणुसकीचा प्रवाह अजूनही थांबलेला नाही!
सोलापूर – निसर्गाच्या रौद्र रूपासमोर माणूस क्षणभर हतबल होतो, पण माणुसकीचे बळ असेल तर कोणतेही संकट लहान ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे येथील छायाचित्रकार पवन घटकांबळे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाने हे जिवंत उदाहरण निर्माण केले आहे.
अस्मानी संकटामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर जनावरांनाही जीव गमवावा लागला. या दुर्दैवी परिस्थितीने व्यथित झालेल्या पवन घटकांबळे यांनी आपल्या मित्रपरिवाराला मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्या या हाकेला त्वरित प्रतिसाद मिळाला आणि काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली.
या माध्यमातून जवळपास १००० किलो धान्य (तांदूळ, साखर, गहू), ४० शाळेच्या बॅग्स, ५०० बिस्कीट पुडे आणि ५० नवीन साड्या जमा झाल्या. या सर्व वस्तूंचे ५० मदत किट तयार करून पवन घटकांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः ५२४ किलोमीटरचा प्रवास करत सोलापूर-विजापूर हायवेवरील हत्तूर, चंद्राल, सिंदखेड, शमशापूर आणि शिंद्रे या पूरग्रस्त गावांमध्ये मदत वाटप केले.
“त्या गावांमध्ये अजूनही शेतात चिखल आहे, घरांचे नुकसान झालेले आहे, आणि अनेक ठिकाणी शासकीय मदत पोहोचलेली नाही. अशा वेळी ग्रामस्थांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे अश्रू आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान होते,” असे घटकांबळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, लहान मुलं शाळेच्या बॅगसाठी धाव घेत होती. ज्यांना बॅग मिळाली त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू पाहून सर्व श्रम सार्थकी लागल्याची जाणीव झाली. तरीही, अनेक मुलांना बॅग देता न आल्याची खंत त्यांना आजही वाटते, असे ते भावूक होऊन म्हणाले.
“शासकीय मदत येईपर्यंत नागरिक म्हणून हातभार लावणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या परीने पाऊल उचलल्यास कोणतेही संकट मोठे राहत नाही,” या शब्दांत पवन घटकांबळे यांनी सर्व मदतकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.