मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर दि.16 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय धम्मपरिषदेचे आयोजन
जागतिक धम्मगुरु दलाई लामा उपस्थित राहणार
महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर रोजी आयोजित धम्मपरिषदेस लाखोंच्या संख्येने महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर उपस्थित राहण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
मुंबई ( प्रतिनीधी )दि. 11- मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात येत्या 16 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बौध्द धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व शांतीचा संदेश देणा-या या बौध्द धम्म परिषदेस जागतिक बौध्द धम्मगुरु दलाई लामा उपस्थित राहणार आहेत. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या दि.16 डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात लाखोंच्या संख्येने बौध्द आंबेडकरी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केले. वानखेडे स्टेडीयम येथील गरवारे क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, पद्मश्री कल्पना सरोज, अविनाश कांबळे, रिपाइंचे सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग; मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे; सचिनभाई मोहिते; नागसेन कांबळे; रवी गरुड ; घनश्याम चिरणकर; आदि मान्यवर उपस्थित होते.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीच्या वतीने या धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या डाँ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे असुन कार्याध्यक्ष भदंत डाँ.राहुलबोधी महाथेरो आहेत. सरचिटणीस अविनाश कांबळे आहेत. खजिनदार पद्मश्री कल्पना सरोज आहेत. तसेच धम्म चळवळीतील अनेक मान्यवर या समितीचे सदस्य आहेत.
महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी भारतात ऐतिहासीक धम्मचक्र प्रवर्तन केले. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धम्मदिक्षेमुळे भारतात बौध्द धम्माचे पुर्नजीवन झाले. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपुर येथे महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयांयासह बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांनी दुसरा धम्मदीक्षेचा कार्यक्रम मुंबईत 16डिसेंबर 1956 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.त्यामुळे मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर बौद्ध धम्मदीक्षा कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा अधुरा राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आंतरराष्ट्रीय बौध्द धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनतेने आणि बौध्द अनुयांयानी येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात उपस्थित राहावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
जगात आज दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद असा हिंसाचाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट आणि हिंसाचार होत आहे. शांतता भंग होत आहे. हमास आणि इस्त्रायलचे युध्द सुरु आहे. अनेक लोकांचे लहान बालकांचे त्यामध्ये जीव जात आहेत. हा हिंसाचार रोखला गेला पाहिजे. जगात शांततेची गरज आहे. जगात पुन्हा शांतता स्थापन करण्यासाठी; जगाला मानवतेचा विचार देण्यासाठी ; भगवान बुध्दांनी दिलेल्या धम्माची; त्यांनी दिलेल्या अहिंसा, शांती, बंधुता, मैत्री या विचारांची गरज आहे. मानवतेचा विचार भगवान बुध्दांनी दिला आहे. विश्वशांतीसाठी जगाला युध्द नव्हे तर बुध्दांची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात विश्वशांतीसाठी जागतिक बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धम्मपरिषदेस लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. या जागतिक बौध्द धम्मपरिषदेच्या आदल्या दिवशी दि.15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता वरळीच्या बीडीडी चाळ येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून महालक्ष्मी रेसकोर्स मैदानापर्यंत विश्वशांती धम्मरॅलीचे आयोजन पुज्य भदंज राहुलबोधी महाथेरो यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिली.