13 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

spot_img

अक्कलकोट तालुक्यातील जनसेवक व्यक्तिमत्व: गोगावचे विद्यमान उपसरपंच कमलाकर सोनकांबळे

अक्कलकोट तालुक्यातील जनसेवक व्यक्तिमत्व: गोगाव गावचे विद्यमान उपसरपंच.मा.श्री. कमलाकर सोनकांबळे

१८ मे… पत्रकार, संपादक, समाजसेवक, गोगाव गावचे विद्यमान उपसरपंच श्री. कमलाकर सोनकांबळे यांचा आज जन्मदिवस… त्यानिमित्त आजचा हा शब्दप्रपंच..
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी पंचक्रोशीतील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल,मोजकीच लोकसंख्या असलेलं टुमदार गाव म्हणजे गोगाव. या गावातील अनेक व्यक्तीमत्वानी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या,नेतृत्वाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. गोगाव गावातील अनेकांनी आपल्या स्वकर्तुत्वाच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. पण त्यांनी आपले जन्मगाव असलेल्या गोगावची नाळ कधीच तुटू दिले नाहीत.श्री. मधुकर सुरवसे, श्री. लकप्पा गायकवाड,श्री.कल्लाप्पा बनसोडे, श्री.प्रदीप जगताप ( माजी सरपंच), श्री.कल्याणराव बिराजदार (तात्या) यांचे गोगाव गावासाठीचे योगदान अमूल्य आहे.त्यामुळे यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी करावासा वाटतो. यांच्याच समाजकार्याच्या पवित्र माळेमध्ये गुंफले जाणारे, या सर्वांच्या समाज सेवेचा वारसा पुढे घेऊन जाणारे नाव म्हणजे गोगाव गावचे विद्यमान उपसरपंच श्री. कमलाकर सोनकांबळे साहेब…
गोगाव गावातील श्री. ज्ञानदेव व सौ. राजवा सोनकांबळे या समाजसेवक मातापित्यांच्या पोटी श्री. कमलाकर यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गोगाव येथे झाले तर माध्यमिक शिक्षण श्री. एस एस शेळके प्रशाला वागदरी या ठिकाणी झाले. उच्चमाध्यमिक शिक्षण हे ज्युनियर कॉलेज मुरूम या ठिकाणी झाले. त्यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच पत्रकारिता सुरू केले असून, दैनिक लोकमत मध्ये युवा मंच व दैनिक संचार मध्ये तरुणाई या सदरासाठी कॉलेज प्रतिनीधी म्हणून काम करत असतानाच त्यांचा ओढा हा समाजातील वाईट प्रथा परंपरेला मातीत गाढून, भेदभाव विरहित नवसमाज निर्मिती झाली पाहिजे याकडे होता. त्यातूनच ते वेगवेगळ्या मार्गाने समाजकार्याकडे वळले. समाजकार्याचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच भेटले. त्यांचे वडील हे चळवळी वृत्तीचे होते . भजन कीर्तन भारुड यांचे ते उत्तम प्रकारे गायन करत. तसेच ते जमेल तसे सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न करत होते.वेगवेगळ्या मार्गाने श्री. कमलाकर सोनकांबळे हे समाजकार्य करत असतात. त्यांचे समाजसेवेचे प्रमुख अस्त्र म्हणजे त्यांचे दैनिक यश सिद्धी न्युज हे वृत्तपत्र. ते या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील अनेक वाईट प्रथा, परंपरा, रूढी यावर सडेतोडपणे प्रहार करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या ग्रंथांचे,पुस्तकांचे वाचन केलेले आहे. यातूनच त्यांची वैचारिक समृद्धी वाढत गेली आणि समाजातील अन्याय अत्याचार विरुद्ध त्यांच्या मनामध्ये चिड निर्माण होऊ लागली. मग ते आपल्या निर्भीड पत्रकारितेतून याला वाचा फोडण्याचे काम करू लागले.
दिवसा गणिक समाज बदलत आहे.समाजामध्ये अन्याय, अत्याचाररुपी वाईट प्रवृत्तीने सारा समाज पोखरून निघत आहे. त्या समाजाला दिशा देण्याचे, धाडस देण्याचे कार्य हे आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून श्री.कमलाकर सोनकांबळे हे करत आहेत. तालुक्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांशी श्री.कमलाकर सोनकांबळे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या जिव्हाळ्याच्या संबंधाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.उजनीचे पाणी कुरनुर धरणात आल्यामुळे धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी येण्यास मदत होत आहे.या कुरनूर धरणाचे पाणी घोळसगाव तलाव व त्यातून भुरीकवठे,गोगाव, वागदरी या भागामध्ये आले पाहिजे व यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये देखील समृद्धी आली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आपल्या दुष्काळी भागामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी, आहे ते तलाव खोल केले पाहिजे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या तलावामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये साठवून त्याचा उपयोग पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी व गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी होईल असे त्यांचे मत आहे. व त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत .अशा प्रकारे सर्वच बाबतीमध्ये त्यांचे कार्य हे सतत आविश्रांत चालूच आहे.जगामध्ये फक्त आणि फक्त बोलक्या सुधारकांचा भरणा भरलेला असताना,आपल्या कार्यातून,वाणीतून लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे कार्य श्री. कमलाकर सोनकांबळे हे करत आहेत. नुसताच दिखाव्या पुरत समाजकारण आणि स्वतःचे घरदार भरण्यासाठी राजकारण करणारे खूप आहेत, पण आपल्या समाजकारणातून आणि जनप्रिय राजकारणातून सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सर्वांग सुंदर सजवणारे श्री. कमलाकर सोनकांबळे हे याला अपवाद आहेत. श्री. कमलाकर सोनकांबळे हे आपल्या वागदरी पंचक्रोशीतील बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. ते शिक्षण, राजकारण, साहित्य,कला, क्रीडा समाजकारण,पत्रकारिता या सर्वच विषयाची जाण असणारे प्रगल्भ व्यक्तिमत्व आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारावर श्रद्धा ठेवून, डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिकवण व संघर्ष हे सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य हे श्री. कमलाकर सोनकांबळे हे करत आहेत.डॉ. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक हालअपेष्टा सहन करून,दलित समाजाच्या उद्धाराचे कार्य केले. हातात सत्ता असल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यासाठी प्रथम सत्तेच्या सिंहासनावर बसले पाहिजे, या विचाराने प्रेरित होऊन श्री. कमलाकर सोनकांबळे यांनी आपल्या आफाट समाजकार्याच्या जोरावर, सर्वसामान्यांच्या मदतीने आज ते गोगाव गावच्या उपसरपंच पदावर विराजमान आहेत आणि या पदाच्या माध्यमातून ते आपल्या समाज बांधवांच्या जीवनामध्ये आर्थिक सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे जीवनकार्य हे अनेकांना प्रेरणादायी आहे. श्री. कमलाकर सोनकांबळे हे आपल्या कृतीतून,आपल्या विचारातून ग्रामीण भागामध्ये समाजसेवेचे, जनसेवेचे बीज रोवण्याचे महान कार्य करत आहेत. अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून सामाजिक विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, सम्यक अभ्यासिका केंद्राचे निर्मिती अंतिम टप्प्यात आहे,

 

आपल्या ग्रामीण भागातील युवकांना डॉ.बाबासाहेबांच्या महान कार्याची ओळख व्हावी, यासाठी गोगाव या आपल्या जन्म गावामध्ये १४ एप्रिल या डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन स्वतः पुढाकार घेऊन, आपल्या नेतृत्वाखाली पार पाडले.डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी गावातील व गोगाव पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कला, क्रीडा,साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शोषित वंचित क्षेत्रातील मंडळींना प्रेरणा देण्याचे काम आदरणीय श्री. कमलाकर सोनकांबळे यांनी केले आहे. ते आपल्या मालकीच्या असलेल्या दैनिक यशसिद्धी न्यूज या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, ग्रामीण जनतेचे सुखदुःख समाजासमोर यथोचित मांडण्याचे कार्य करत आहेत. ते आपल्या चौकस आणि निपक्ष, निडर पत्रकारितेच्या जोरावर तालुक्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. श्री. कमलाकर सोनकांबळे हे पत्रकारिता,राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उच्च दर्जाचे कार्य करत आहेत. ते आपल्या सर्वच महापुरुषांची जयंती अतिशय उत्साहामध्ये दरवर्षी साजरी करत असतात.यावेळी प्रथमच श्री. कमलाकर सोनकांबळे यांच्या नेतृत्वात गोगाव येथे शिव बसव आंबेडकर संयुक्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आले.या सर्व महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा उद्देश म्हणजे,या महापुरुषांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजाचे संस्करण झाले पाहिजे आणि त्यातून सशक्त समाज उभा राहिला पाहिजे हेच आहे. श्री. कमलाकर सोनकांबळे यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना वेगवेगळ्या अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ते सध्या सम्यक बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे चेअरमन,सम्यक उद्योग समूहाचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष व ज्या संस्थेच्या मालकीचे वृत्तपत्र ते चालवतात अशा सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. कोरोना काळामध्ये सोलापूर, अक्कलकोट, गोगावं ग्रामीण भाग व पुण्यासारख्या शहरात संस्थेच्या माध्यमातून मोफत किट वाटप करण्यात आले आहेत व त्यासोबत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आलेली होती.ग्रामीण भागातील तरुण हा व्यवसायभिमुख झाला पाहिजे,तो उद्योग धंद्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात सुख समृद्धी आणली पाहिजे यासाठी ते आपल्या लेखणीतून,वाणीतून समाज प्रबोधन करण्याचे काम सतत करत असतात. व्यसनाधीनतेला आळा घालण्याचे काम ते करत असतात. ते आपल्या सम्यक उद्योग समूह या संस्थेच्या माध्यमातून अनेक नवयुकांना उद्योग धंद्याची माहिती देऊन, त्यांना उद्योग धंदा करण्याकडे प्रेरित करण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. ते सतत गोरगरीब समाज बांधवांना मदतीचा हात देत असतात .अनेक सरकारी योजनांची माहिती व या योजनांचा लाभ ते सर्वांना मिळवून देण्याचे कार्य करत असतात. सरकारी योजना या जनतेच्या कल्याणासाठी असतात ,त्याचा लाभ सर्वांना मिळालाच पाहिजे हा यामागचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यांच्या तेजस्वी समाज कार्याबद्दल लीहिण्यासारखे खूप खूप आहे.पण तूर्तास एवढेच…
गोगावच्या क्षितिजावरील हा तेजस्वी तारा असाच सदैव तळपत राहू दे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभू दे आणि आपल्या हातून उदंड समाज कार्य घडत राहू दे हीच आजच्या या आपल्या वाढदिवसाच्या शुभ दिनी सदिच्छा. आणि आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

शब्दांकन..
श्री मारुती देविदास शिंदे.
मु.पो. वागदरी. ता.अक्कलकोट..
मो.७०८३५६३६५९.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img