वाडगं : खूप काही शिकवणारं आत्मकथन
प्रीती माने
आत्मचरित्र वाचणं हा नेहमीच एक वेगळा अनुभव असतो. ते वाचत असताना काही काळापुरतं का होईना, आपण लेखकाच्या आयुष्याचा, जीवनपटाचा जणू एक भाग होऊन जातो. काहीसा असाच अनुभव वाडगं यात जाणवत राहतो. बी अनिल तथा अनिल भालेराव याच्या वाडगं या आत्मकथनाने एक वेगळीच शैली मनाला भिडत राहते. सहज, सोपी, ओघवती आणि आपलीशी वाटणारी भाषा ही या आत्मकथनाची जमेची बाजू आहे. लेखक त्याचा बालपणीच्या आठवणी सांगत सहजच मन व्यापून टाकतो.
लेखकाच्या आयुष्यातील त्याचं बालपण ते शालेय शिक्षण हा भाग अगदी गंमतीशीर तर आहेच त्याचबरोबर समस्येतून बाहेर कसे यावे, हेही शिकवतो.ज्या परिस्थितीत त्याचं आयुष्य घडलं ती चिमुकल्या वयातील किंवा वाढत्या वयातील मुलांसाठी पूरकच नाही, तर अशा प्रतिकूल परिस्थितीत मनाचा संयम आणि स्वयंशिस्त ढळू न देता योग्य मार्गांवर चालणं ही खरोखर एक मोठी परीक्षाच आहे, हे या आत्मकथनात दिसून येतं.लेखकाच्या सभोवती जे जे घडलं ते त्याने जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. म्हणजे त्याच्या वयातील मुलं ज्याप्रमाणे विविध ठिकाणी, विविध प्रसंगी वावरतात, निरागसपणे सारं काही पाहतात, त्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार अर्थ लावतात किंवा नाहीतर मग निर्वीकार राहतात. अगदी तसाच तटस्थपणा आत्मकथनात जाणवत राहतो आणि तोच मनाला भावतो.दैनंदिन जीवनातील अडीअडचणीचे, वेदनादायी वर्णन करणारे प्रसंग असो की गंमती जमतीचे मौजमजेचे असो हे सर्व काही तटस्थपणे मांडले आहे. कुटुंब, नातेवाईक, मित्र ही माणसाच्या जीवनातील खरी शक्ती,संपती आणि स्फूर्ती असते, जी सहजपणे माणसाला जगण्याची दिशा देत असते हे सुद्धा पदोपदी या आत्मकथनात जाणवत राहतं. इतर मित्र परिस्थितीमुळे वाकून जातात तेथे अनेक अडचणीवर मात करत लेखक शिक्षण पूर्ण करत एक आदर्श डोळ्यासमोर उभा करतो.”शिक्षण हाच पाया आणि शिक्षण हीच शिडी…. जीवनाच्या उत्कर्षसाठी ” हेच हे आत्मकथन अधोरेखित करते.
शोषित वंचित समाजाचा विविध पिढ्यांचा अनुभव हा वेदनादायी तर आहेच, त्याचबरोबर संघर्षमय सुद्धा आहे. यात धर्मातरीत बौद्ध समाजाने डॉ. आंबेडकर यांचा आदर्श जपत स्वाभिमानी जगणं किती कठीण आहे, हे आव्हानात्मकरित्या लेखक आत्मकथनाच्या माध्यमातून मांडताना दिसतो, पण कुठेही आकस किंवा द्वेष डोकवताना दिसत नाही. लेखकाचे जगणं प्रत्येक पिढीतील मुलांसाठी प्रेरणादायी आहे, आत्मकथन वाचून खडकात, रानावनात, काट्याकुपाटयात उमलणारी काही फुलं असतात ज्यांना मशागत मिळते ना खतपाणी तरीसुद्धा ती तग धरून राहतात, फुलतात आणि स्वतः आनंदी होतं इतरांनाही आनंदी करतात. वाडगं खरोखर एक संघरषाबरोबर आनंद यात्रा सुद्धा आहे.
पुस्तकाचे नाव :वाडगं
लेखक :अनिल भालेराव
प्रकाशक :चेतक बुक्स, पुणे
पृष्ठे :144
किमत :270 ₹