सोलापूर लोकसभेसाठी डुप्लिकेट दाखले वाल्यांना उमेदवारी देऊ नये : राजाभाऊ सरवदे
राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिल्यास मोठ्या मताधिक्याने निवडून येतील
सोलापूर : ( प्रतिनीधी ) अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघावर हल्ली बोगस दाखले असलेल्यांचे अतिक्रमण वाढत आहे. अनुसूचित जाती उमेदवारांवर यामुळे अन्याय होत आहे. हे थांबलं पाहिजे. डुप्लिकेट दाखले वाल्यांना उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट करतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभारले तर निश्चित निवडून येतील. ते नाहीतर रिपाइंचा स्थानिक उमेदवार म्हणून मी आहेच ,अशी भूमिका रिपाइं (आठवले)चे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
यापूर्वी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत मित्र पक्षाला रिपाइंने खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष म्हणून रिपाइंला जागा मिळावी अशी आमची मागणी आहे. स्थानिक उमेदवार गरजेचा आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील 48 जागांपैकी दोन जागेचा प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठविला आहे. त्याचा निर्णय लवकरच होईल. शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ जागेसाठी रिपाइंची मागणी आहे.
मित्र पक्षाकडे आम्ही सोलापूरच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. या जागी यंदा रिपाइं गटाला संधी मिळावी. यापूर्वी मित्र पक्षांना योग्य सहकार्य केले आहे.निवडणूक लढवायचीच या दृष्टीने पक्षाने मतदार संघात पक्षाची बांधणी केली आहेअसल्याचे सरवदे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्यास निश्चित निवडून येतील. ते नसतील तर मी स्थानिक उमेदवार म्हणून असेल. पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढविण्यास तयार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी यावेळी स्पष्ट केले.