मी अक्कलकोट बसस्थानकाची जुनी इमारत बोलतेय
नवनिर्माणाच्या नावाखाली आज मला मातीत गाढले गेले. माझ्या भाव भावनांचा विचार न करता मी म्हणजे निर्जीव वास्तू आहे या भावनेतून माझ्यावरती बुलडोजर फिरवला गेला. असंख्य वेदना सहन करत मी कोसळत होते. मधल्या मधी मी धाय मोकलून रडत होते .तडफडत होते पण माझी कदर कोण करणार? सर्वांना तर वाटत होतं ना मी निर्जीव आहे. पण तसं नाही ओ, मी सजीवच होते. मला पण भावभावना होत्या .माझा कंठ दाटून येत होता .भूतकाळातील असंख्य रम्य सुंदर आठवणीचे मला भरते आले होते. मला पाडत असताना जवळजवळ सर्वांनाच अपार आनंद झाला होता .की येथे अनेक सोयी सुविधायुक्त नियोजित भव्य दिव्य इमारत आकाराला येणार म्हणून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे .पण ती नवीन इमारत देखील माझंच अंश आहे हे आपण विसरलात का? जीवनाचा नियमच आहे की एखाद्याला मोठे करत असताना एकाला मातीत गाडून घ्यावं लागतं. मग मी तर कशी अपवाद ठरणार. असो मी माझ्या जन्मापासूनच्या माझ्या मातीत गाडण्यापर्यंत च्या आठवणींना उजाळा देणार आहे. 50- .60वर्षांपूर्वी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटामध्ये मी आपल्या सेवेमध्ये रुजू झाले. माझा रुबाब म्हणाल तर एखाद्याला हेवा वाटावा असा होता. एसटीच्या साध्या बसेस पासून ते हिरकणी, शिवशाही, स्लीपर कोच, शिवनेरी यासारख्या एकाहून एक रुबाबदार बसेस माझ्या अंगा खांद्यावर दररोज वावरत होत्या. त्यांची पाय धूळ माझ्या मस्तकी सदानकदा लागत होती. काय अभिमान वाटायचा मला याचा. वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये म्हणजेच माझ्या घरामध्ये बसलेले कंट्रोल साहेब आपल्या भारदार अवाजा मध्ये माजी लालपरी कोठून कुठे जाणार आहे याचे निवेदन करायचे , त्यांचा आवाज माझ्या कानात अजून जसाच्या तसा घुमतो आहे. नव्हे त्या आवाजाची मला गोडी लागली होती. सवय झाली होती.एसटीच्या असंख्य अधिकाऱ्यांनी माझ्याच छायेखाली बसून आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक आदेश दिलेले मी पाहिलेत. दररोज असंख्य प्रवासी मायबाप माझ्या अंगा खांद्यावर सदानकदा खेळत होती .माझ्या सावलीखाली विसावा घेत होती. कॉलेजच्या मुला मुलींचे तर हक्काचे ठिकाण म्हणजे लाल परी आणि मी. कितीतरी रम्य आठवणींचा खजिना त्यांच्या पारड्यात मी टाकला आहे. कितीतरी मायबाप प्रवासी माझ्या आश्रया खाली निवांतपणे जेवण करायचे . माझी मुलं म्हणजे चालक वाहक ही दिवसभर रात्रभर काम करून माझ्याच कुशीत मनसोक्त झोपायची .माझ्याच मांडीवर बसून जेवण करायची. आपल्या सवंगड्या सोबत गप्पा गोष्टी करायचे .हे सारं मी कसं विसरू तुम्हीच सांगा ?माझ्या अस्तित्वामुळे कितीतरी लोक आपला चरित्रार्थ चालवायचे . माझ्यावरच कितीतरी लोकांनी आपला संसार थाटला आहे .स्थानक प्रमुख साहेब, एसटीचे अनेक अधिकारी, खास करून चालक वाहक यांचा रुबाब माझ्याच छत्र छायेखाली चालायचा.
चालक वाहक यांना गाडी जवळ येऊन प्रवासी हे मोठ्या आपुलकीने विचारायचे, साहेब ,दादा ,मॅडम ही गाडी कुठे जाते व त्यावर चालक वाहक म्हणायचे अगं तायडे, अहो मामा ,अहो दादा ही गाडी या मार्गे जाणार म्हणजे तुमच्याच गावावरून जाणार नाही का? या सर्व गमती जमती माझ्याच अंगणात चालायच्या .काय सांगू तुम्हाला मला माझा खूप अभिमान गर्व वाटायचा. शिवजयंती असो, बाबासाहेबांची जयंती असो दिवाळी असो की एसटीचा वर्धापन दिन असो त्यावेळी मला मनापासून आपण सजवत होतात. आकर्षक रोषणाईने मला उजळून टाकत होतात. हे तुमचं प्रेम मला विसरणे शक्य आहे का? सांगा सांगा बरं! अहो तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मी पण तुमच्यावर मनापासून जीव लावला आज तुम्ही मला पाडताय त्याबद्दल माझ्या एका डोळ्यात दुःख आहे. पण माझ्या दुसऱ्या डोळ्यात अपार आनंद आहे .मी वरती आपणास रागाच्या भरात बोलून गेले, त्याबद्दल आपण मनामध्ये राग नका धरू बरका ओ! मी आत्ता म्हातारी झाले, थकले .माझी जागा आता दुसरी ने घ्यावा असंच मलाही वाटतंय. हिला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा .जीवनभर माझ्यासारखीच लोकसेवेसाठी धडपडत रहा. मायबाप प्रवासी जनतेला, लालपरीच्या सेवकांना आधार देत रहा..
आता लोकसंख्या वाढली माझी लेकरं म्हणजे लालपरीची संख्या वाढली. माझं देखील वय थकत चाललं होतं त्यामुळे ना इलाजाने तुम्ही मला जमिनीत गाडल .माझ्या मनात वेदना प्रचंड आहेत पण आनंद देखील खूप आहे मला मातीत गाडून ,माझ्या जागेवर भव्य दिव्य इमारत निर्माण करणार आहात अनेक सुविधानि युक्त ती वास्तू पुढील कित्येक वर्ष प्रवासी मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी थाटात उभी असेल आणि आपणास अधून मधून माझी निश्चितच आठवण येत राहील. अहो माझ्या मनात सांगण्यासारखं खूप खूप काही आहे .पण मला आता पुढे बोलवे ना ओ.मी आता इथेच थांबते बर का. मला मनापासून निरोप द्या .“आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा.”…..
नमस्कार…. टाटा…. बाय-बाय….
शब्दांकन, लेखक,
मारूती देविदास शिंदे.
बस वाहक अक्कलकोट डेपो