स्वराज्यजननी माँ जिजाऊ
अशीच आमची आई असती सुंदर रूपवती । आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ॥
परस्त्री विषयी यादराने काढलेले उद्गार असा संस्कारी ध्येयवादी अज्ञाधारक स्वराज्य संस्थापक निर्माते छत्रपतींना घडवणाऱ्या माँसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ . ज्या जिजाबाईंचा प्रवास परकर पोलक्यातली जिजापासून स्वराज्य निर्मिती ते राष्ट्रमाता असा सुरू झाला . त्यांनी आपल्या अपार त्याग कष्ट जिद्द कर्तृत्वामुळे स्वराज्याचं एक धगधगतं अग्निकुंड निर्माण केलं . त्या जिजाऊंच्या चरणी मानाचा मुजरा .
लहानपणापासूनच जिजाऊंनी संस्कार राजनीति घोडेस्वारी तलवारबाजी यांची चुणूक वेळोवेळी दाखवली .स्वराज्याचे ध्येय उरी बाळगून ते शिवरायांच्या डोळ्यात रात्रंदिवस तेवत ठेवण्याचे काम जिजाऊंनी केलं . आणि कौशल्याने ते निर्माण करून घेतलं . शिवरायांना राजनीतीचे डावपेच, भावनिक आव्हानांचे धडे, शूरवीरांच्या पराक्रमांचे आदर्श , महाभारत रामायणातील धाडसी पराक्रम उत्कृष्ट संघटन आणि ध्येयाप्रति इमान सांभाळण्याची जिद्द यांचा खजिना त्यांचा प्रेरणास्त्रोत म्हणजे माँ जिजाऊ त्यांच्या त्यागापुढे व कर्तुत्वापुढे नतमस्तक व्हावे अशा रनरागिनी म्हणजे माँसाहेब .
महिलांवर गरिबांवर होणाऱ्या अन्यायाची प्रचंड चीड व तेवढाच उद्दवेग हे त्यांच्या निर्णय कौशल्याने कळते . हेच बाळकडू त्यांनी शिवरायांना दिले . गर्भसंस्कार ते बालसंस्कारापासून शिवरायांची जडणघडण प्रत्येक कठीण परिस्थितीत शिवबांचा आधार असणाऱ्या शिवरायांच्या दिशादर्शक व राजकीय मार्गदर्शक म्हणजेच माँ जिजाऊ .तेवढ्याच खंबीरपणे स्वराज्याच्या स्वप्नांचा डोलारा सांभाळणाऱ्या तेवढ्याच धैयाने आपल्या पती शहाजीराजेनां खंबीरपणे साथ देणाऱ्या जिजाऊ .महिलांचा अपमान करणाऱ्याला चौरंगाची शिक्षा कशी बरोबर हे सिद्ध करणाऱ्या व पती निधनानंतर सती न जाता स्वराज्याला सर्वस्व मानणाऱ्या उच्च मनोधैर्य असणाऱ्या माँ जिजाऊ . स्वराज्याच्या राजमाता झाल्या .
इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत ज्यात त्यांची समय सूचकता निर्णय क्षमता व राजनीतीचे ज्ञान लक्षात येते . शिवाजी महाराजांची नजर कैद असेल ,अफजलखानाचा वध असेल ,सिंहगडाची मोहीम असेल पन्हाळ्याचा वेडा असेल सुरतेची लूट असेल रायगड म्हणून राजधानीची निवड असेल एवढंच काय पण तोरणा किल्ल्याने स्वराज्याचे तोरण बांधले तो तोरणा जिंकण्याचा मानस असेल . लाल महालाचा जीर्णोद्धार असेल अशा एक ना अनेक घटना असतील ज्यात जिजाऊंचे कर्तब दिसते .अशा अनेक मोहिमा आहेत ज्या शिवरायांनी जिजाऊंच्या निती मूल्यांमुळे जिंकल्या आहेत . संपूर्ण जगामध्ये ज्यांचे चरित्र अभ्यासले जाते असे चरित्र निर्माण करणाऱ्या योगिनी म्हणजे माँ जिजाऊ .
मासाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला वडील लखोजीराजे जाधव व आई म्हाळसाबाई जाधव यांची त्या कन्या .लहानपणीच उच्च कोटीचं देशप्रेम धर्मप्रेम एकनिष्ठा अंगीकारली .एक उत्कृष्ट योद्धा वीर माता धाडसी पत्नी स्वतंत्र विचारांची कन्या अशी ज्यांची ओळख . जेवढ्या तेजोमय वलयात त्या होत्या तेवढच संघर्ष मय जीवन देखील त्यांच्या वाट्याला आलं .त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी 16O9 मध्ये झाला . घोडे घोडेस्वारी तलवारबाजी यात त्या माहीर होत्या .आणि तेवढ्याच प्रेमळ हळव्या मनाच्या देखील होत्या .तानाजी जेव्हा कोंढाण्याच्या मोहिमेत धारातीर्थी पडल्यानंतर रायबाचे लग्न स्वतःच्या हस्ते त्यांनी लावून दिले .प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजून कर्तव्य पूर्ण करणाऱ्या जिजाऊ अशा अनेक प्रसंगातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला वेळोवेळी दिसून आले .ध्येय कितीही उच्च असले तरी आपले पाय नेहमी जमिनीला आपल्या मातीला घट्ट धरून असावेत अशी त्यांची शिकवण . त्या शिवबांना देत . प्रसंगी हळव्या तर राज्याचे नियम जो मोडेल त्यास कडकशासनही करायच्या म्हणूनच तर स्वतंत्र स्वराज्य निर्माण झालं . शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अकराव्या दिवशीच माँ जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला . म्हणजेच 17 जून 1674 रोजी त्या आपल्याला पोरकं करून गेल्या .
एक आदर्श माता, त्यागी पत्नी वीरमाता, संघर्ष कन्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन शतशः मानाचा मुजरा .
पुन्हा अशी कन्या नाही . . . .
पुन्हा अशी पत्नी नाही . . . .
पुन्हा अशी माता नाही . . . .
एकमेव अद्वितीय राजमाता पुन्हा नाही .
घडविले ज्यांनी छत्रपतींना नतमस्तक आम्ही जन्मोजन्मी राष्ट्रमाता जिजाऊंना .
हीच मानवंदना हाच मुजरा
माँ साहेबांना .
श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर (धस ) -( विषयशिक्षिका )
जि प प्रा शाळा उमरगे
ता .अक्कलकोट जि सोलापूर
Mob.9403449285