सतीश पाटील हे अनेकांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार – : वैष्णवी जगदाळे
जीवन जगताना माणसाच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात. या प्रत्येक प्रसंगातून चांगले वाईट अनुभव येतात. अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती दिसून येतात. बहुतेक माणसे ही स्वत:साठी जगतात तर थोडी फार माणसे ही इतरांसाठी जगतात. व हेच लोक जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून देतात. पण हा आदर्श घालून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष साधना केलेली असते आणि त्यानंतरच ते सकल मानव जातीला मार्गदर्शक ठरतात. कारण त्यांनी जीवनातलं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलेलं असतं. आणि आपण मात्र संपूर्ण जीवन अविचाराने जगतो. सद्याच्या कलीयुगात असे लोक फारच कमी प्रमाणात लाभतात आणि हेच लोक सकल मानव जातीने उध्दारक ठरतात. असे लोक आपलं संपूर्ण जीवन आदर्श तत्त्वांनी जगतात. पृथ्वीवर जन्म घेतलेल्या मानवरुपी देहामध्ये माणूसपण निर्माण करण्याचं कार्य ते करतात. ज्यांनी आपलं आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी खर्च करायचं असं ठरवलं ते लोक ध्येयवेडे असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला जीवन कसे जगावे, भविष्यात कसे यशस्वी व्हावे याची कला शिकवणारे मा. सतिश पाटील (सर) यांना आज ५० वर्ष पुर्ण होत आहेत. मा. सतीश पांडूरंग पाटील यांचा जन्म १३ जानेवारी १९७४ साली कडदोरा ता. उमरगा जि. उस्मानाबाद येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना देखील त्यांचे मोठे बंधू साहेबराव पाटील यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सतिश पाटील यांचे शालेय शिक्षण हे छत्रपती शिवाजी विद्यालय बलसूर ता. उमरगा तर महाविद्यालयीन शिक्षण हे राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी या ठिकाणी बी. एस्सी. ॲग्री ही पदवी संपादन करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश यश संपादन केले. आज मा. सतीश पाटील (सर) पुणे येथे (विभागप्रमुख, यू.पी.एस.सी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे – ४५) येथे सेवेत आहेत. एखाद्याला चांगली नौकरी, निरोगी आयुष्य व शांत जीवन लाभल्यास आता आयुष्य निवांत जगायचे असे प्रत्येकाचे मत बनते. परंतु पाटील सर येथेच न थांबता त्यांच्या १५ वर्षाच्या शासकीय नोकरीच्या कालावधीत पुणे येथे त्यांनी यशदा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अविरतपणे चालू ठेवले यावरूनच त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ दिसून येते.
समाजातील चांगले विचारवंत, पंडीत, विद्वान माणसे सोबत घेऊन समाजकार्य प्रत्येकजण करू शकतो. परंतु समाजातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या अंगी शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास करून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे महान कार्य सतीश पाटील (सर) हे करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांना निरंतर शिकवित राहणे आपले उच्च विचार विद्यार्थ्यांपर्यंत सुलभतेने पोहचविणे व त्यांना घडविण्याचे कार्य हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे व व्यक्तीमत्व विकासामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी आज शासकीय नोकरीत वेगवेगळ्या हुद्यावर आहेत. यावरूनच त्यांची कार्यप्रणाली दिसून येते. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या समोर नतमस्तक होतो. सरांच्या या कार्यामध्ये त्यांचे मोठे बंधू साहेबराव पाटील, लातूर येथे चार्टड अकाऊंट असलेले व्यंकटराव पाटील, सरांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई सतिश पाटील यांनीही त्यांना या प्रवासात मोलाची साथ दिली आहे. आज पाटील सरांना ५० वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
वैष्णवी दिपक जगदाळे
मु पो नळदुर्ग, ता तुळजापूर, उस्मानाबाद ( धाराशिव )