विविध मागण्यांसाठी सरपंच परीषदेचे मंत्रालयावर आंदोलन करण्यात येणार
सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे- सरपंच सौ वनिता सुरवसे यांचे आव्हान.
सोलापूर ( प्रतिनिधी) : ग्रामविकासाच्या अडचणी लक्षात घेऊन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अडवोकेट विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंचांना एसटी महामंडळाच्या बस मध्ये प्रवास मोफत करावा, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा , सरपंचांना दरमहा सरसकट दहा हजार रुपये व उपसरपंच यांना तीन हजार रुपये तसेच सदस्यांनीही मानधन सुरू करावे तसेच अन्य मागण्यासाठी २२ मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई भव्य मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी तसेच शासन व प्रशासन यांनी लोकप्रियतेसाठी शहराच्या उदात्तीकरणाला नेहमी प्राधान्य दिले. त्यामुळे ग्राम विकासाला खीळ बसली आहे. राज्यातील सरपंच यांच्या अनेक समस्या तसेच ग्रामपंचायतचे प्रश्न त्याचप्रमाणे ग्रामविकासाच्या असंख्य अडीअडचणी असून या बाबतीत धोरणात्मक बदल झाला नाही. अनेक मागण्यांसाठी अखेर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यानाच रस्त्यावर उतरावे लागेल असा निर्णय सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, पदाधिकारी, यांनी मोठ्या संख्येने या धडक मोर्चात आंदोलनासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, कविताताई घोडके पाटील व जिल्हा समन्वयक, गोगावच्या सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी केले आहे.