23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

आंबेडकरी विचारवंत लेखक साहित्यिक  डॉ. दत्तात्रय गायकवाड चौंसष्ठ वर्षे सरताना….

आंबेडकरी विचारवंत लेखक साहित्यिक  डॉ. दत्तात्रय गायकवाड चौंसष्ठ वर्षे सरताना….

वाढदिवसानिमित्त प्रासंगिक लेख
———————–
आयुष्याची ६४ वर्षे सरली….. ६५ वर्षात पदार्पण…. ६४ नॉट आउट असा स्कोअर बोर्ड झळकतो आहे.
अजूनही धावपट्टीवर…. नाबाद…
आठवणी व अनुभवाची मालिका फेर धरते. खरे, माणसाने इतिहासातून जय पराजयाच्या कारणांचे संदर्भ घेऊन वाटचाल करावी लागते. आयुष्याच्या वाटचालीत चढ-उतार असतात. जीवनाचे प्रश्न संदर्भ आणि परिस्थिती बदलत राहते. भूतकाळ समजून घ्यावा लागतो. एक आहे की, माणसाला कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. ओढून काढून आणता येत नाही. कष्ट करावे लागतात. अभ्यास करावा लागतो. घडावे लागते. घडवावे लागते. शिकावे लागते. चांगलं व्हायला व करायला वेळ लागतो. यासाठी आम्ही सहन केलेल्या व्यथा, वेदना, दुःख, दैन्य, दास्य, अपमान, यांना शब्दबद्ध करून वाट करून दिली. आमचे सभोवताली घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व धार्मिक घटनांतून जीवनाची वाटचाल चालू आहे. वैचारिक चीड, निषेधाची जाणीव, आणि काय करायला हवे यासाठी लेखन अविरत चालू आहे. निरपेक्ष, निर्लेप , निर्विकार भूमिकेची मांडणी चालू आहे. परिणामत: यावर ‘भरती-ओहोटी जीवनसंघर्ष’ साकार झाले. फुले आंबेडकरी साहित्याचा वैचारिक प्रवास सुरु झाला.
२.
सेवानिवृत्तीनंतर म्हणजे जून २०२० ते जून २०२४ दरम्यान, एकूण सात ग्रंथ, ४८ भाषणे व सुमारे २५० पुस्तके वाचकांना भेट दिली. आंबेडकरी विचार चळवळ चालू ठेवली. ग्रंथापैकी दोन ग्रंथ प्रा. गौतम गायकवाड यांनी आमच्या साहित्यावर संपादित केली. पाच स्वलिखित पुस्तके प्रकाशित केली.
जन्मदिनादिवशी केवळ केक कापणे; मेणबत्ती विझवणे; केक तोंडाला लावणे असे न करता शांतपणे वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आपला वाटा किती देता ….येईल यावर भर दिला
३.
आंबेडकरी विचार आता देशा-प्रदेशा पुरता, जातीपुरता मर्यादित राहिला नसून तो जगभरच्या वंचितांना व शोषितांना लागू होताना दिसत आहे. यामुळेच त्याला वैश्विक विचार प्रणाली बनली आहे. सामाजिक जाणीव निर्माण करणे, आत्मभान यासाठी तयार करणे, घडविणे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी सांगणे, सतत मनुष्यत्वाची स्थापना करत राहणे, नवी दिशा देणे, एक नवा आयाम निर्माण होताना दिसत आहे. बुद्ध कबीर फुले आंबेडकरांची वैश्विक विचार माझ्या अभ्यासाचे आधार आहेत. यातूनच लेखनाची दिशा मिळत गेली. फुले आंबेडकरी विचार वैश्विक आहेत. एकविसाव्या शतकातील आंबेडकर एक वैश्विक विचारवंत म्हणून पुढे येताना दिसत आहेत.

जागतिकीकरणात माणसाचे जीवन बदलत आहे. पैसा हाच मानवी जीवनाचे केंद्रस्थान बनला आहे. जगण्याची साधने कमविणे, जास्त कमाई करणे, धनसंचय करणे, श्रीमंतीची प्रदर्शन करणे, हाच माणसाचा फंडा बनला आहे. हे खर आहे.
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना सार्वजनिक जीवनात मात्र अज्ञान, अनास्था, अहंकार, हीनपणा, बारीकसारीक चुका करण्याची वृत्ती, हेवेदावे, प्रचंड राजकारण याचा सामना करायला करावा लागला. हे सत्य आहे. ज्यांनी निबंध देखील नीट लिहिला नसेल, लग्नपत्रिका नीट छापली नसेल, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पेनातली रिफीलची देखील मदत केली नसेल… अशांच्याकडून अपमान, हेटाळणी व कुचेष्टाला सामोरे जावे लागले. सरकारी नोकरी असताना प्रसिद्धीची हाव नव्हती. ग्रंथालय व माहिती शास्त्र संशोधन करणे, लेखन करून पुस्तके प्रकाशित करणे, आपली भूमिका स्पष्टपणे करणे, वैयक्तिक तंटेबखेडे, कोर्टकचेरी करणे, रात्री उशिरापर्यंत जागून लेखन करणे, सतत सत्याचा ध्यास धरणे, छोट्या छोट्या कारणावरून सत्यासाठी चिडणं, हा सर्व संघर्ष डोळ्यापुढे येतो. जिथे काम करतो तिथे अनास्था, अवहेलना अपमान वाट्याला आले. अनेक ठिकाणी आपले बरोबर असूनही तडजोड करून पुढच्याला सरळ करणे होत आले. तरीही साहित्यावर व ग्रंथावर प्रचंड प्रेमाची आस सोडली नाही. आयुष्यातला एक टप्पा पूर्ण करत हळूहळू शिखराची एक एक पायरी चढत …..प्रवास झाला. पुस्तकातून वाचनातून नेहमी योग्य दिशा मिळत गेली. वाचन, लेखन व भाषणे यात प्रचंड दंग होत गेलो. आज ६२ वर्षे कसे गेले… कळलेच नाही. जिथं बालपण गेले प्राथमिक- माध्यमिक शिक्षण झालं. त्या हायस्कूल आष्टा कासार येथे दहावी झालो. पुढील शिक्षण पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले. परिस्थिती अनुकूल नसताना सकारात्मकतेचा ध्यास घेतला. विद्यार्जन केले. आयुष्यात प्रत्येक माणसे दिशा देणारी, मदत करणारी भेटली. काही ठरवलं नव्हतं. घडत होते. घडत गेलो. बी.ए.; बिलिबआयएससी; एमलिबआयसी आणि पीएचडीचे शिखर गाठले. आयुष्यात कष्ट, परिश्रम व वेळेचा सदुपयोग करून प्रकाशाकडे धाऊ लागलो. ती धमक आपोआप येत गेली. अनेक समस्या, अडचणी, उणिवा, त्रुटी ,संकटे, अपघात दुष्काळ यांना पादाक्रांत करत यशाचा कळस शोधत राहिलो. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेतून ‘ग्रंथालय व माहिती अधिकारी’ म्हणून सेवानिवृत्ती सुखावणारी घटना म्हणावी लागेल.

४.
आंबेडकरी विचारनिष्ठा जपण्यासाठी, सतत वाचन व चिंतन यातून आदर्शाचा शोध घेत असायचो. माणसाच्या जीवनात स्वभाव, वर्तन आणि चिंतन हे व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे घटक असतात. विचार करताना सकारात्मकता, उपयुक्तता व आदर्श समोर ठेवून प्रवास करावा लागतो. बदलत्या परिस्थितीत आपणास टिकून राहायचे असेल तर सत्य आणि व्यवहार हातात हात घालून जायला हवे. याची कास धरत. बऱ्याच वेळी आपला प्रामाणिकपणा व स्पष्टवक्तेपणा कसा मिळतो हे दिसून आले. माझं एक चतुर्थांश आयुष्य कोर्टकचेरी करण्यात गेले. सत्याचा शोध आणि सत्य काय असते हे सांगण्यासाठी वारंवार कोर्टाच्या प्रांगणात जावे लागते. खरा हा वेळ फुकट गेला. सत्य सांगण्यासाठी देखील धाडस असावे लागते. पुरावे द्यावे लागतात. संघर्ष करावा लागतो. पाठपुरावा करावा लागतो आधार असावा लागतो वेळ द्यावा लागतो पैसा मोजावा लागतो. तेव्हा कुठे सत्यदेखील क्वचितच सापडते याचा प्रत्यय आला.

साधी जीवन वृत्ती जोपासली. वास्तव पाहत गेलो. राजकारण नाही, कोणाशी स्पर्धा नाही, त्यामुळे त्रास झाला नाही. स्वतःलाच समजावत गेलो. त्यामुळे असत्य असूनही सहन करत नाव पैलतीरावर आणली नेट व सरळमार्गी जीवन जगण्यावर भर देत गेलो. जीवनात संकटे प्रलय दुष्काळ महापौर महायुद्धे या घटना टाळणे टाळणे माणसाच्या माणसाला शक्य होत नाही आम्ही मात्र कोणत्याही संकटकाळी पुस्तकांना गुरु मानले पुस्तकांनी जगायला शिकवले सकारात्मक शैली कशी ठेवायची याचा आत्मभान निर्माण केलं. पैशाचा मोह नाही, द्रव्याचा मोहन नाही, संपत्तीची हाव नाही, जीवनाचा कार्यकारण भाव केव्हाच ओळखला होता. आपली नोकरी शिक्षण व अनुभवाने जीवन सार्थकी लावण्याची जिद्द बाळगली आपल्यासोबत समाजातील इतर सर्व घटकांना विकास व समृद्ध व्हावे यासाठी ‘पे बॅक टू सोसायटी’ भावना बाळगत गेलो. धम्म चळवळीकडे वळलो.
सतत वाटत राहिले की सर्वानी प्रकाशाकडे वाटचाल करावी. अंधारयात्री म्हणून प्रवास करत राहिलो. जाता जाता काही प्रकाश किरणे अंगावर आलीही. जीवन चागंले, अधिक अर्थपूर्ण, शांत, सुरक्षित सृजनशील व्हावे म्हणून माणूस धडपड करत असतो. जीवनमुल्ये घडवत असतो. त्याप्रमाने आपल्या भावनांची रसद ग्रंथरूपाने देण्याचा प्रयत्न केला. केद्रं शासनाची आचारसंहिता….नोकरी म्हणून जबाबदारी साभांळत भाषा , धर्म, संस्कती आणि समाज यातील बदलांचे निरीक्षणे नोदंवत राहिलो. मुळ विचार हा क्रांतीचे उगमस्थान असते. ही जाणिव बाळगून प्रवास करत राहिलो. आंबेडकरी विचारांचे बळ आणि धम्माभिलाषी असल्याने, आतापर्यतं प्रकाशित झालेले नवीन आवृत्त्या मिळून २१ ग्रंथ, १०० शोधनिबंध/लेख, १८० पेक्षा जास्त व्याख्याने, अनेक चर्चासत्रात, धम्मपरिषदात सहभाग घेत आलो. काहीतरी आपण समाजाचे देणे लागतो. ती परतफेड करण्यासाठी शेरपाची भुमिका करत आलो. एखाद्या गिर्यारोहकाला शेरपा वाटाड्या, व इतर रसद पुरवतो. त्याप्रमाणे विचारांचा जागर कायम धगधगता राहावा यासाठी, परिवर्तनासाठी, बदलासाठी, विचार गतिमान करण्यासाठी शब्दरूपाने रसद पुरवत गेलो.
माती नुसती पडून असते शेती करावी लागते. चागंले पीक येण्यासाठी दरवर्षी जमिनीची मशागत करावी लागते. दगड रस्त्यावर पडून असतात , त्यानां घडवावे लागते. शब्द हे शब्दकोशात निपचत पडलेले असतात, त्यानां बाहेर काढून आशयाच्या अंगाने चिरेबंद करावे लागते. कोणीतरी येवून गारगोटीवर गारगोटी घासावी लागते तेव्हा ठिणग्या पडतात. तेव्हा हात जागवावे लागते, माणूस जागवावा लागतो. त्याला ignate करावं लागतं, प्रज्वलित करावं लागतं, हक्काची व जबाबदारीची जाणिव करून द्यावी लागते. विचारदेखील स्थिर असतात त्यानां आशयानुसार रचनात्मक माडंणी करावी लागते……हेच प्रबोधनात्मक कार्य चालू ठेवले आहे.

विशेष म्हणजे, 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही देव नाकारला. बाबासाहेबांनी धर्म नवे धम्म दिला. एक तत्वज्ञान म्हणून बौद्ध धम्माकडे पाहायला हवे. अलीकडे बौद्धांमध्ये व्रतवैकल्ये वाढली आहेत. देव-देव वाढले आहेत. बौद्ध माणूस तीर्थक्षेत्रांना बौद्ध जाताना दिसतोय. याला छेद तर नाही ना…?

४.
बौद्ध धम्म गतिमान व्हायला हवा. विवेकावर आधारित धर्म चळवळ निर्माण व्हावी. यासाठी पूर्वीपासूनच ठरवलं होतं की समाजाचा तळ ढवळताना.
आमचे वाचन, चिंतन आणि आंबेडकरवादी विचारनिष्ठा कामी आल्या. विद्यार्थी दशेपासूनच ठरवलं होतं की समाजाचा तळ ढवळायचा. यासाठी वर्तमानपत्रात पत्र लेखन करत असे. नोकरी करतच जाणिवा व्यक्त करणे सोपे नाही. हे कळत होते. तरीही शोध घेत राहिलो. लिहीत राहिलो. बौद्धधम्म आणि आंबेडकर या विचारांच्या राजमार्गावर चालत राहिलो. साहित्य, समाज संस्कृती आणि प्रबोधन क्षेत्रातील उजेड यात्रेत सहभागी झालो. बदलते वास्तव, विचारनिष्ठा, परिवर्तन आणि पुरोगामी विचारांची सहल करत राहिलो. प्रकट होत गेलो. विविध उपक्रम राबवले. आम्ही आंबेडकर विचार जपला, धर्म विचार जपला, नव्हे तर सांस्कृतिक मूल्ये जपली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान पुस्तकातून वाचत होतो. परंतु सभोवताली परस्परविरोधी विचार विरोधी वातावरणात जीवाची घुसमट होत होती. विचार प्रदूषण होते. यासाठी समाज प्रबोधन व्हायला हवे हवे वाटायचे. बुद्ध, फुले, बाबासाहेब किती वेळा सांगायचे ? आजची पिढी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांपासून भरकटत आहे. प्रेरणांपासून दूर जात नाही याची खबरदारी घ्यायची ठरवले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने विषय घेऊन शोध घेत राहिलो. आज आत्मपरीक्षणाची गरज आहे. असे वाटू लागले.

५.
आज डोक्यात कोणते वाचन नाही, विचार नाही, कार्यक्रम नाही,… असा दिशाहीन अवस्था दिसून येते. आजच्या तरुणांना डीजे हवाय, मनोरंजन हवेय. यात आंबेडकर -फुले यांचे विचार दूर जात आहेत. त्यांना पेरियार नको, संत गाडगेबाबा नको, त्यांना संत तुकाराम नको, त्यांना संत नामदेव नको, महात्मा फुले नको, छत्रपती शाहू नको, त्यांना आंबेडकर नको, बसवेश्वर नको, धर्मचिकित्सा नको, चर्चा नको, महापुरुषांचे पोवाडे नको, परिवर्तनवादी साहित्य नको, भाषणे नको, मनोरंजनासाठी गाणी हवीत. यासाठी समाजाची दुरावस्था होत आहे. समाजस्वास्थ्य बिघडत आहे. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, व्यभिचार, मत्सर, कुटिलता, डावपेच, फॅशन, अनिर्बंध राहणीमान….यामुळेच माणुसकी व मानवता नष्ट करणारे कुशल कर्म घडत आहे. तेव्हा मानवतावादी, वैश्विकवादी, विज्ञानवादी विचार पेरण्याची गरज आहे. यासाठी लेखनप्रपंच केला.

६.
यानिमित्ताने आठवणी निघतात, सन १९६० ते १९७० च्या दशकात आठवते, आमचे गावकुसाबाहेरचे जगणे. आई-वडील, शेजारीपाजारी, समाज आठवतो. घर लहान. पावसाळ्यात गळायचे. तेव्हा लोक धर्मशाळेत झोपायला सायंकाळी पाच सहा वाजताच जागा धरायचे. आपापल्या गोधड्या टाकायच्या. जागा बुक करायचे. आमचे घरच्या शेळ्या. रोज शेतावर जायचे. हातावरचे पोट. उदरनिर्वाह करायचा. गरिबीशी संघर्ष असायचा. आईसोबत गाणगापूरच्या यात्रेला जायचं. दहावी नंतर पुन्हा यात्रेचे नाव काढले नाही. घरात एक वस्तू असे तर दुसरी नसे. तेवढ्यावरच भागवायचे.वेळ मारून न्यायची. असे पाय पसरायला संधी नव्हती. गादीवर झोपायची माहीत नव्हते. गोंधड्या आमची गादी असे. सततच्या दुष्काळाला कंटाळायचं सुकडी मिळायची. त्याच्याच आई पोळ्या करायची. बाजारातून आणलेले भजे, काकडी, पेरू हे आमची चैन होते. आम्रखंड, श्रीखंड, बासुंदी ही तर माहीतच नव्हती. शेळीचे दूध असायचे. वासामुळे आवडत नसे. गुळाचा चहा करायचं.
दुधाचा चहा क्वचीत मिळवायचा. यात्रेत पडद्यावर चित्रपट पाहत असायचो. एखाद्याकडे सायकल, रेडीओ, हातात मनगटी घड्याळ, आणि वर्तमानपत्र पाहिले की भारी वाटायचे. टीव्ही माहित नव्हता. आम्ही हे सारेअनुभवले.

७.
अस्पृश्यतेचे चटके सहन केले. ते वेगळेच. तेव्हा काळ बदलतो आहे. जग बदलते. जीवन बदलते आहे. जीवनाची साधने बदलत आहेत. याचा प्रत्यय अनुभवानेच येत आहे. माणसाचे जीवन प्रवाही व परिवर्तनशील आहे. हे अनित्य आहे. हे खरे आहे. बदलत्या परिस्थितीशी तडजोड करीतच प्रगती कडे कूच करावे लागत आहे.

विल्यम शेक्सपियर म्हणतात, ‘मी रोज आनंदी असतो. कारण मी कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही. अपेक्षा माणसाला दुखावतात. जीवन क्षणभंगूर आहे. त्यावर प्रेम करा. आनंदी राहा. जीवन तुमचं तुम्ही जगा. बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका. लिहिण्यापूर्वी नीट विचार करा. खर्च करण्यापूर्वी काही तरी कमवा. काही मागण्या पूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या. तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा. मरण्यापूर्वी आयुष्य जगा’
सेक्सपियर म्हणतात ते खरे आहे. आता कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. सयंम, संवाद व समन्वय साधायला हवा. अन्यथा कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा होऊ शकतो. महात्मा गांधी ने हेच सांगितले आहे. ‘जीवन म्हणजे कधी एका सरळ रेषेत नसते. पुष्कळदा परस्परविरोधी कर्तव्याची ती एक मोळी असते. म्हणून प्रत्येकाला सतत या ना त्या अशा कोणत्यातरी कर्तव्याचे निवड करावी लागते’.
Human life is a series of compromises मानवी जीवन ही तडजोडीचे अखंड मालिका आहे. याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

अंतिमतः, मी नेहमी समग्र जीवनात उच्च नैतिक तिचा सौंदर्याचा अभाव दिसून येतो यावेळी इंग्रज कवी टी. एस.‌ एलियट विचारतो,

Where is the life we have lost in living?
Where is the wisdom we have lost in knowledge ?
Where is the knowledge we have lost in information ?

जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे ? ज्ञानात हरवलेले शहाणपण कुठे आहे ? माहितीत हरवलेले ज्ञान कुठे आहे ?
माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.‌ ज्ञान म्हणजे शहाणपण नव्हे. जगणे म्हणजे जीवन नव्हे. पण हेही खरे की माहिती शिवाय आणि ज्ञानाशिवाय शहाणपण कठीण. असे जगण्याशिवाय जीवन जगणे कठीण. सुंदर जगणे म्हणजे जीवन. ग्रीक वचन सांगते त्याप्रमाणे सुंदर जगणे ही शहाणपणाची देणगी असते. असे शहाणपण विज्ञान देऊ शकत नाही. ते देण्याची क्षमता धर्मात राहिली नाही. पण जीवनाच्या सर्व गुणांचा शोध घेणाऱ्या कलेत निश्चित आहे. कला हा आधुनिक जगाचा धर्म आहे. आधुनिक जगाच्या अध्यात्म आहे. हे लक्षात घेऊन आपण व्यक्ती आणि समाज प्रवास करायला हवा….!!!

संदर्भ ग्रंथ:
————
१. संभाजी, खराट; अध्यक्षीय भाषण. २३
२३ फेब्रूवारी २०१४ लातूर येथिल ८वे
सत्यशोधकी साहित्य संमेलन
अस्मितादर्श ; एमेजू २०१३: २७-२८,
३० ,

२. भोसले, शिवाजीराव; जागर, अक्षरब्रह्म
प्रकाशन ; मार्च २००५ पृ १६३

३. कुलकर्णी, अंजली; जागतिकीकरणात
परिणामांचा कथावेध , दैनिक लोकसत्ता
लोकरंग ; रविवार , ५ जून २०२२ पृ ४

४. गायकवाड, दत्तात्रय; भरती-ओहोटी;
स्वंयदीप प्रकाशन, पुणे २०१५

५. विल्यम शेक्सपियरचा सुविचार
आंतरजालावरून…

६. शिरवाडकर के.र.; आपले विचारविश्व;
राजहंस प्रकाशन, पुणे ; २०१३; पृष्ठ
३३६

डॉ दत्तात्रय गायकवाड,
२० जून २०२४

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img