स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इस्माईल मूर्डी यांनी गरीब कुटुंबातील दहा मुलांना दत्तक घेत शिक्षणाची जबाबदारी उचलली
जेथे दातृत्वाची प्रचिती , तेथे कर माझे जुळती….
अक्कलकोट प्रतिनीधी
गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा अभिमान असतो असं आपण नेहमी म्हणतो. ग्रामीण भागातल्या गरीब आणि होतकरू मुलांना आधार देत त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. काही संवेदनशील मनाचे शिक्षक सामाजिक दायित्वाचे भान ठेवून गरीब आणि होतकरू मुलांच्या पंखांना बळ मिळावे म्हणून तन-मन-धनाने सहकार्य करण्यासाठी पुढे येतात.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा हत्तीकणबस येथील सेवानिवृत्त झालेले केंद्रीय मुख्याध्यापक श्री इस्माईल मौला मुर्डी सर यांनी इतरांसाठी एक नवा आदर्श वस्तू पाठ घालून दिला. सेवानिवृत्त झालेले असताना देखील आपला बहुमोल वेळ खर्च करत शाळेच्या विकासामध्ये योगदान देत आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री इस्माईल मूर्डी सर यांनी गरीब कुटुंबातील दहा मुलांना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या गरीब मुलांच्या शिक्षणाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी श्री इस्माईल मुर्डी सर यांनी मुख्याध्यापकांच्या नावे पाच हजार रुपये इतक्या रकमेचा चेक सुपूर्द केला. या दातृत्वाच्या भावनेचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मान होत आहे.
इयत्ता दहावी मध्ये बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना श्री.मुर्डी सर यांनी प्रत्येकी पाचशे एक रुपयाचे पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन केले.
केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून शाळेची जबाबदारी पार पडत असताना गावातील सर्व पालकांना एकत्रित आणून शाळेच्या विकासामध्ये सामावून घेतले. गावातील सर्व सदन पालक, मोठे शेतकरी, शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व पदाधिकारी या सर्वांना विश्वासात घेत शाळेच्या भौतिक विकासात भर घातली. लोकवर्गणीतून शाळेसाठी दोन संगणक संच उपलब्ध करून घेतले. आज त्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील गरिबांची मुले संगणकाची धडे घेत आहेत. लोकसभागातून तब्बल अडीच लाख रुपये जमा करून शाळेतील मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधता यावे यासाठी दोन गुंठे जागा खरेदी केली. आज शाळेत मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची दोन युनिट उपलब्ध झालेले आहेत. या सर्व कार्यामध्ये गावातील सन्माननीय सरपंच श्री. श्रीशैल माळी साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र बिराजदार, उपाध्यक्ष श्री. पंचप्पा घोडके, सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, माझी तंटामुक्त अध्यक्ष श्री बसवराज माणिक बिराजदार, प्रगतशील बागायतदार शेतकरी श्री. सिद्रामप्पा दोड्याळे मामा आणि गावातील असंख्य पालक, शिक्षण प्रेमी यांचे सहकार्य लाभले.
काल स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सोहळा साजरा करत असताना गावातील उपस्थित सर्व पालक सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी श्री इस्माईल मुर्डी सर यांचे मनापासून अभिनंदन केले. अक्कलकोट तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री प्रशांत अरबाळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सोमशेखर स्वामी साहेब, हत्तीकणबस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश शटगार साहेब या सर्वांनी श्री. मुर्डी सर यांचे कौतुक केले. इतरांनीही मुर्डी सरांचा आदर्श घ्यावा अशी भावना या सर्वांनी व्यक्त केली..