नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं. एवढच नाही तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उपोषणालाही बसले, अखेर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संपूर्ण राजीनामा नाट्याबाबत पवारांनी त्यांची भूमिका मांडली, तसंच राजीनामा मागे घ्यायचं कारणही सांगितलं.
’56 वर्ष मी निवडून आल्यापासून संसद आणि विधिमंडळात आहे. अनेक वर्, मी जबाबदारी घेत आहे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असं मला काही महिन्यांपासून वाटू लागलं होतं, म्हणून मी हा निर्णय घेतला. पक्षातील कार्यकर्त्यांची एवढी तीव्र प्रतिक्रिया येईल, असं वाटलं नाही. दोन दिवसात समजूत काढू, असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे.
ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत, पण शरद पवारांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे. निकाल काहीही लागला तरी विधानभवनामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल गेला तरी बहुमत त्यांच्याकडे आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. बारसूमधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली. पर्यावरण बदल न होता शेतकऱ्यांच्या हिताचे आणि रोजगार कसा तयार होईल, याचे निर्णय घ्यावे लागतील. पोलीस बळाचा वापर करून होणार नाही, असा सल्लाही शरद पवारांनी दिला. अजित पवार भाजपसोबत जातील का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा, अजित पवारांचा पिंड फिल्डवर काम करण्याचा आहे. काही लोक काम करणारे आहेत. अजित पवारांना मीडियात येण्याची चिंता नाही, अजित पवारांबद्दल जे बोलले जाते ते तसे नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.