18.1 C
New York
Wednesday, November 6, 2024

Buy now

spot_img

“ध्येयनिष्ठ कर्मयोगी –कै.पंचप्पा कल्याणशेट्टी सर “

“ध्येयनिष्ठ कर्मयोगी –कै.पंचप्पा कल्याणशेट्टी सर “

हरणा नदीच्या काठावर वसलेलं जेमतेम चार -पाच हजार लोकवस्तीचं गाव. या गावात माता गुरुबसव्वा व पिता तिप्पणा या दांपत्याच्यापोटी ४ जानेवारी १९४७ला एक पुत्र-रत्न जन्माला आला .ज्या बाळाच नांव ठेवण्यात आल पंचप्पा. “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” या म्हणीप्रमाणे” हे मुल जन्मापासुन जात्याच हुशार आहे हे वडिलांच्या लक्षात आले. वडिल अशिक्षित असले तरी शिक्षणाचे महत्त्व जाणून होते.शिक्षणाविषयी मनामध्ये प्रचंड आस्था व तळमळ होती.परंतु परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. चार मुली, तीन मुले असल्याने कुटुंबाचा खर्च मोठा पण त्या प्रमाणात उत्पन्न कमी व सार कांही शेतीवर अवलंबून असलेल. मुलांना शिकवलं पाहिजे ही आतंरिक इच्छा होती पण अडचण पाठ सोडत नव्हती .सरांच व दोन्ही भावंड मल्लप्पा व सिद्धप्पा यांचे प्राथमिक शिक्षण हन्नूरच्या जिल्हा परिषद शाळेत पुर्ण झाले. पण पुढील शिक्षणासाठी सोलापूरशिवाय पर्याय नव्हता. तशातच औताचं एक बैल वारलं. हल्या – बैलाची जोड करून शेती केली पण परिस्थितीपुढे हार न मानता पंचप्पा, मल्लप्पा व सिद्धप्पा या तिन्ही मुलांना शिक्षणासाठी सोलापूरला ठेवलं. मुलांना ही परिस्थितीची, वडिलांची होत असलेली ससेहोलपट तसेच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव होती. पंचप्पा सरांनी आपल एम.ए.बी. एड. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना जवळच्या चप्पळगावच्या शाळेत नोकरी लागली. कधी पायी,कधी सायकलवर असं करत सर चप्पळगावला जातं.त्यावेळी गावाला वेळेवर एस.टी. ची. सोय नव्हती.दुसरे भाऊ मल्लप्पा यांचं ही शिक्षण पुर्ण झालं आणि ते ही किणीच्या हायस्कूल मध्ये नोकरीस लागले. सरांच्या स्वभावातच समाजसेवेची ओढ असल्याने कांहीतरी आपण समाजासाठी, गावांसाठी केलं पाहिजे ही भावना सरांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी हन्नूर व परिसरातील नन्हेगाव, पितापूर, सुलतानपूर या शेजारच्या गावातील मुलां-मुलींसाठी प्राथमिक शिक्षणानंतरच्या पुढील शिक्षणाची सोय नव्हती त्यांना दूरवर पायपीट करत जावं लागायचं, पुढील शिक्षणाची सोय नसल्याने विशेष करून मुलींना इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहावं लागायचं हे सर्व ओळखून त्या सर्वांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांची पायपीट थांबावी याकरिता गावातल्या समविचारी, उच्चशिक्षित मित्रांना सोबत घेऊन तसेच “भरत-लक्ष्मणासारखे” सावली प्रमाणे पाठीशी उभे ‌असणाऱ्या मल्लप्पा व सिद्धप्पा या दोन भावंडांच्या मदतीने “महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेची सन १९७०साली स्थापना केली. संस्थेच्या ” उद्यमेन हि सिद्य्यंति कार्याणि न मनोरथैः” या ब्रीदवाक्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा गावातील तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी “संत ज्ञानेश्वर वाचनालय (सन १९८४)सुरू केले. नंतर एका वर्षांतच ” अनंत चैतन्य प्रशाला(सन १९८५) या नावाने माध्यमिक शाळा काढली व या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली.सरांचे धाकटे बंधू सिद्धप्पा हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. या शाळेत शिकणाऱ्या गरीब, होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी ” तक्षशिला विद्यार्थी वसतिगृह” सुरू केले.आज या शाळेत ५३५ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून २६ जण कार्यरत आहेत. या प्रशालेत नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन या भागातील व गावातील गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे संसार उभे केले व इथूनच सरांच्या लोककल्याणकारी कार्याला खऱ्या अर्थानं सुरूवात झाली. सर मुळात ध्येयवादी तर होतेच, सोबतच कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रचंड आत्मविश्वास , जबरदस्त इच्छाशक्ती,दुरदृष्टी हे गुण अंगी असल्याने तासंतास बसुन स्वतः काम करण्याची, तसेच”हाती घ्याल ते तडीस न्या”या उक्तीप्रमाणे पाठपुरावा करून काम करवून घेण्याची हातोटी असल्यामुळे स्वस्थ बसतील ते सर कसले?
क्रीडांगण विकास योजना, युवकांकरिता व्यायाम शाळा, राळेगणसिद्धीच्या धर्तीवर ग्रामविकास योजना, वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड करण्यासाठी रोपवाटीका, निर्मल ग्राम, निरोगी ग्राम विकास योजना,मोफत सर्वरोग निदान व चिकित्सा शिबीर, महिला समुपदेशन केंद्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन व अत्यल्प भाडेतत्त्वावर अवजारे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “कृषी सेवा केंद्र” व बी-बियाणे खरेदीसाठी अर्थसहाय्य, धान्य बॅंक योजना “, राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, महिला जाणीव जागृती अभियान , महिला बचतगट स्थापनेकरिता मार्गदर्शन व प्रोत्साहन अशी अनेक समाजहिताची कामे समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या सरांनी संस्थेच्या व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अतिशय कार्यक्षमपणे राबविले. समाजकारणासाठी राजकारणाची जोड असावी लागते याकरिता सरांनी राजकीय क्षेत्रात ही काम केलं मात्र मिळालेल्या पदांचा उपयोग ही सरांनी समाजकार्याकरिताच केला. त्याबरोबरच सौ.सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अक्कलकोट .अनंत चैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय हन्नूर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र , नालंदा मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, अक्कलकोट, मातोश्री गुरुबसव्वा महिला महाविद्यालय,गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळा,डे-स्कुल,योग- प्राणायाम प्रशिक्षण केंद्र,
अशा विविध शैक्षणिक विभागाच्या वतीने लहान मुलें-मुलीं,युवक-युवती, सेवांतर्गत महिला-पुरूष या सर्वांकरिता शिक्षणाची दारे खुली केली.
पण हे सर्व करता-करता “आधि केले नी मग सांगितले” यास तंतोतंत जुळेल असे आचरण असलेल्या, सुपारीची खांड ही न खाणाऱ्या सरांचे, आरोग्यविषयक काळजी घेण्याचे व निर्व्यसनी राहण्याविषयी सातत्याने सांगणाऱ्या सरांचे मात्र स्वतःच्या आरोग्याकडे या सर्व कामाच्या ओघात दुर्लक्ष झाले आणि सरांना एका दुर्धर आजाराने घेरले पण खचून न जाता तशाही परिस्थितीत सरांनी अखेरपर्यंत आपल्या कामात तसूभरही खंड पडू दिला नाही.अखेरच्या श्वासापर्यंत आपले काम मोठ्या हिमतींने जणू मला कांही झालेच नाही असे समजून त्याचा लवलेशही चेहऱ्यावरती कधी दिसू न देता आपले काम अविरतपणे पुर्वीच्याच ताकदीने अन जोमाने सर करतच राहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरांनी १९७० साली स्थापन केलेल्या हन्नूर सारख्या खेड्यात
लावलेल्या एका संस्थारुपी इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.आज अनेक मुलें – मुली या वृक्षाची गोड फळे चाखत आहेत, अनेक जण या वृक्षाच्या सावलीत विसावत आहेत.ही संस्थेची धुरा आज सरांचे सुपुत्र, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांचे आमदार व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.सचिनदादा कल्याणशेट्टी आपल्या खांद्यावर घेऊन चुलते श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी व श्री. सिद्धप्पा कल्याणशेट्टी या दोघांच्या विचारांने आणि मार्गदर्शनाने व त्यांच्या धर्मपत्नी सौ.शांभवीताई, बंधू मनोज,मिलन व सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या साथीने व सरांनी केलेले संस्कार,त्यांची शिकवण व प्रेरणेतून अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत व त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करीत असून त्याचा आणखीन विस्तार करण्याबरोबरच सरांचे प्रत्येक स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
खरंच सरांच जगणं हे एका ध्येयनिष्ठ कर्मयोगी प्रमाणे होते. “स्वतःसाठी जगता आलं नाही तरी इतरांसाठी जगावं, इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसताना त्यातच आपलं प्रतिबिंब पहावं” या उक्तीप्रमाणे संपूर्ण आयुष्य जगलेल्या सरांना खरोखर स्वतः साठी जगताच आले नाही याची खंत माझ्यासारख्या सरांच्या संस्थेत कार्यरत असलेल्या व सरांच्या सहवासात वावरलेल्या सरांचा स्वभाव ,त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जिद्द, चिकाटी, मेहनत, कार्यकुशलता , क्षमता ,तत्परता पाहिलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहे.”साधी राहणी, उच्च विचारसरणी” यापद्धतीने जीवन समर्पित केलेल्या सरांविषयी लिहावे तितके कमी आहे. ” माणूस जेंव्हा एका विशिष्ट ध्येयांनी प्रेरित होतो तेंव्हा अखंड परिश्रम,त्याग,संघर्ष,तहान-भूक विसरून त्याच्यामागे कसा धावतो याच एक मुर्तीमंत प्रतीक म्हणजे कै.आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सर. आज त्यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त सरांना विनम्र अभिवादन व सरांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अशोक शरणप्पा साखरे
पर्यवेक्षक
अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, हन्नूर.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img