21.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

छात्रभारतीचे चाळिसावे अधिवेशन उत्साहात

छात्रभारतीचे चाळिसावे अधिवेशन उत्साहात

दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेत्री अमृता सुभाष , पत्रकार साहिल जोशी प्रा. लक्ष्मण यादव यांची उपस्थिती

मुंबई ( प्रतिनीधी )
विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांची विविध विषयांवरची विचारप्रवृत्त करणारी भाषणे आणि मुलाखती, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील विशेष चित्र शिल्प कला प्रदर्शन, तरुणांचा सहभाग असलेला शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर परिसंवाद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रभक्तिपर कार्यक्रम, भारतीय संविधान व नागरिकांचे शिल्पाकृती, छात्रभारताच्या सर्व केंद्रांचा अहवाल, महाराष्ट्रातील शिक्षण-रोजगाराच्या लढ्याच्या अनुषंगाने ठराव. अश्या भरगच्च कार्यक्रमांसह छात्रभारतीचे चाळिसावे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.

मुंबईच्या चेतना महाविद्यालयात ता. २३ आणि २४ डिसेंबर २०२३ रोजी
हे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. डॉ. दाभोलकर यांच्याविषयीचे चित्रप्रदर्शन हे या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरले. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री अमृता सुभाष, दिग्दर्शक सचिन गोस्वामी, आमदार शिरीष चौधरी, ‘चेतना संस्थे’चे अध्यक्ष श्रीपाद हळदणकर व मा. नितीन वैद्य यांच्या हस्ते झाले.

राष्ट्र सेवा दलासाठी ज्यांच्या मागील दोन पिढ्या काम करत आहेत त्या अभिनेत्री अमृता सुभाष या वेळी म्हणाल्या, ‘‘सेवा दलाचा दोन पिढ्यांचा वारसा मला असल्यामुळे त्याचा उपयोग मला अभिनयक्षेत्रात झाला.’’

छात्रभारतीचे माजी कार्यकर्ते दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, ‘‘मी धुळ्यात असताना छात्रभारतीचे पहिले अध्यक्ष मु. ब. शहा यांच्या अध्यक्षतेखाली कलापथकात काम केले. नर्मदा बचाव आंदोलनातही आमचा सक्रिय सहभाग होता.छात्रभारतीचा चांगला परिणाम माझ्यावर आहे. माझ्या कार्यक्रमांतून माझी भूमिका नेहमी स्पष्ट होत असते.’’ महाराष्ट्रातील हास्यजत्रा या कार्यक्रमातील मामाजींच्या आवाजात ‘हॕलो! अरे काय म्हणतो इथे छात्रभारतीला सगळे जमेले, मी तिथे जायल होतो, त्यांना सांगितलं आपल्याकडे आपल्या विचारांचा एवढा चांगला गोड ऊस ये, लोकांच्या साखर कारखान्यात पाठवा आणि साऱ्या समाजामध्ये साखर वाटा. असे बोलताच सर्व सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांपैकी एक असलेले धनाजी नाना चौधरी यांचा वारसा पुढे नेणारे आमदार शिरीष चौधरी म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांकडून मला या विचारांचा वारसा मिळाला. माझा छात्रभारती विद्यार्थी संघटनेशी तसा जुना परिचय आहे. खिरोदाला शैक्षणिक संस्थेत काम करत असताना काॕलेजमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सेवाभावाने व आत्मीयतेने लढणारे कार्यकर्ते मी जवळून पाहिलेत व तेव्हापासूनच मी छात्रभारतीच्या युवा साथींवर प्रभावित होतो.

दिग्दर्शक नितीन वैद्य यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला, तर छात्रभारतीच्या संघटिका स्वाती त्रिभुवन व सदस्या दीपाली आंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर देवयानी फुले हिने ‘मी सावित्री बोलतेय!’ हे एकपात्री नाटक सादर केले.

प्रा. सागर भालेराव व वनश्री रादीये यांनी ‘मुंबई तक’चे संपादक साहिल जोशी यांची मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांची उत्तरे जोशी यांनी या वेळी दिली. यानंतर छात्रभारतीचे कार्याध्यक्ष समाधान बागुल यांनी ‘मुलींचे मोफत शिक्षण’ या विषयावर मते मांडली. राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांनी ‘मराठी शाळा वाचवा’ याविषयी तरुणांना आवाहन केले. राज्य सचिव छाया काविरे यांनी ‘शिक्षणव्यवस्था आणि बळी पडणारा विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर राज्य-संघटक सचिन बनसोडे यांनी रोजगारासंदर्भातील सद्यस्थितीवर भाष्य केले.

दरम्यान साक्षी गवस, भूषण पाटील, प्रफुल्ल कांबळे, चेतना अमृतकर, युवराज साळवे, निकेत वाळके, अश्विन बाइत, प्रशांत खंदारे, संदीप जाधव,राहुल जऱ्हाड, या छात्रभारतीच्या केंद्रप्रमुखांनी अहवाल सादर केले. ‘रंग अमन के’ या प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमात छात्रभारतीचे महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे ता. २४ डिसेंबर रोजी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर प्रा. लक्ष्मण यादव यांचे व्याख्यान झाले. यानंतर
छात्रभारतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या समारोपात रोहित ढाले यांनी सविस्तर मांडणी करत महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांवर पुढील वर्षभरात कसे काम होईल याबद्दल मार्गदर्शन करत छात्रभारतीची भूमिका मांडली. या दोन दिवसीय अधिवेशनाचे संपूर्ण सूत्रसंचालन लोकेश लाटे व चेतन पाटील यांनी केले.अशी माहिती छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी दिली.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles